Thursday, 8 October 2026

Gसी एफ आय सामाजिक संस्थेतर्फे १४० विद्यार्थ्यांना ३० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

 सी एफ आय सामाजिक संस्थेतर्फे १४० विद्यार्थ्यांना ३० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप



पेण ( राजू मोहिते लक्षवेधी मास मिडिया प्रतिनिधी ) पेण येथील चिल्ड्रन फ्युचर इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने १४० विद्यार्थ्यांना ३० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सी.एफ.आय. संस्थेच्या पेण येथील नुतन कार्यालयामध्ये करण्यात आले होते.


    चिल्ड्रन फ्युचर इंडिया या सामाजिक संस्थेतर्फे पेण, खालापूर व माणगाव तालुक्यातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व शिक्षणा करिता मदत करण्यात येते. यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करण्यात येते. इयत्ता पहिली पासून ते पदवी पर्यंत इंजीनियरिंग डिग्री, डिप्लोमा, एमबीबीएस, बी एम एस, बी एच एम एस, पॅथॉलॉजी, बीएससी, बायोटेक्नॉलॉजी, नर्सिंग, एम एस सी, ए एन एम, जी एन एम, बॅचलर ऑफ अकाउंटिंग इन फायनान्स यासह इतर विविध शैक्षणिक कोर्सेस करण्याकरिता आर्थिक मदत करण्यात येते. संस्थेमार्फत सध्या २२०० विद्यार्थ्यांचे प्रतीपालकत्व घेण्यात आले असून याव्यतिरिक्त इतर सुमारे ५००० गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य, रेनकोट, छत्री, बूट, युनिफॉर्म, वही, पुस्तके, कंपास, पेन व इतर साहित्य देऊन या विद्यार्थ्यांना सहकार्य करीत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांनी याप्रसंगी केले. समाजातील ज्या गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात येते. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्याकरीता सहकार्य करण्यात येते. आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेने शैक्षणिक सहकार्य केले असल्याची माहिती संस्थेचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांनी दिली.


     या कार्यक्रमाला संस्थे मार्फत शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहिलेले अनेक डॉक्टर, इंजिनियर व आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे माजी विद्यार्थी आले होते. त्यांनी संस्थेने दिलेले सहकार्य व आपले अनुभव यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.


        यावेळी जिल्हा व्यावसायिक शिक्षण अधिकारी व ITI अंबरनाथ व ITI उरण येथे प्राचार्य म्हणून कार्यरत राहिलेल्या मारीदास पिल्ले यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाला सी एफ आय चे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख, पेणच्या नगराध्यक्षा, नगरसेविका, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi