*रब्बी हंगामातील विविध योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन*
* तेलबिया,कडधान्ये व अन्नधान्य पिकांसाठी अनुदानाची संधी
* महिला शेतकरी,अनुसूचित जाती-जमाती व दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
धाराशिव,दि.१७ ऑक्टोबर (जिमाका) रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे,सुधारित बियाणांचा वापर वाढावा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा,या उद्देशाने कृषी विभागामार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (अन्नधान्य व वाणिज्यिक पिके),कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) सन २०२६-२७ अंतर्गत रब्बी हंगामासाठी विविध घटकांचा लाभ घेण्याकरिता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले असल्याच्या पार्श्वभूमीवर या योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि दिव्यांग लाभार्थ्यांनाही योजनांच्या लाभासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत भुईमूग, सूर्यफूल आणि करडई या तेलबिया पिकांच्या उत्पादनवाढीसाठी गट पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वितरणाचे घटक राबविण्यात येणार आहेत.यामध्ये भुईमूग पिकाच्या गट पीक प्रात्यक्षिकासाठी प्रतिहेक्टर १४ हजार रुपये,सूर्यफूल पिकासाठी प्रतिहेक्टर ९ हजार रुपये,तर करडई पिकासाठी प्रतिहेक्टर ८ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.या घटकांचा लाभ शेतकरी गट,शेतकरी उत्पादक संघटना (FPO), शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना घेता येणार आहे.
याच अभियानांतर्गत पाच वर्षांच्या आतील वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी भुईमूग पिकाला प्रतिकिलो ११४ रुपये, सूर्यफूल पिकाला प्रतिकिलो ४७४ रुपये आणि करडई पिकाला प्रतिकिलो १०५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे.या बियाणे वितरण घटकासाठी वैयक्तिक शेतकरी पात्र राहणार आहेत.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत हरभरा पिकाच्या उत्पादनवाढीवर विशेष भर देण्यात आला आहे.हरभऱ्याच्या गट पीक प्रात्यक्षिकासाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून, या घटकासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघटना,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था पात्र असतील.
हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी पाच वर्षांच्या आतील वाणांना प्रतिकिलो ६० रुपये,तर पाच वर्षांवरील परंतु दहा वर्षांच्या आतील वाणांना प्रतिकिलो ४० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.या दोन्ही घटकांचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ऊस पिकामध्ये एक डोळा पट्टा पद्धत आणि ऊस व हरभरा आंतरपीक प्रात्यक्षिकासाठी प्रतिहेक्टर ९ हजार रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. या घटकासाठी शेतकरी गट,शेतकरी उत्पादक संघटना,शेतकरी उत्पादक कंपन्या,कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था तसेच वैयक्तिक शेतकरी पात्र राहणार आहेत.
याशिवाय ऊस पिकासाठी सुपर केन नर्सरी या घटकांतर्गत १० हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के,यानुसार अनुदान देण्यात येणार आहे.या घटकाचा लाभ शेतकरी गट,शेतकरी उत्पादक संघटना,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना घेता येणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत गहू आणि रब्बी ज्वारी या पिकांसाठीही विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.गहू पिकाच्या सलग गट पीक प्रात्यक्षिकासाठी प्रतिहेक्टर ९ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.या घटकासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघटना,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र असतील.
रब्बी ज्वारी पिकाच्या गट पीक प्रात्यक्षिकासाठी प्रतिहेक्टर ७ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठीही शेतकरी गट,शेतकरी उत्पादक संघटना,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र राहणार आहेत.
रब्बी ज्वारीच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी दहा वर्षांच्या आतील वाणांना प्रतिकिलो ३० रुपये,तर दहा वर्षांवरील वाणांना प्रतिकिलो १५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे.या दोन्ही घटकांसाठी वैयक्तिक शेतकरी पात्र राहणार आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी स्वतः किंवा नजीकच्या सामाईक सेवा केंद्रामार्फत (CSC) महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.अर्ज करताना पोर्टलवरील 'बियाणे वितरण', 'प्रात्यक्षिक' आणि 'सुपर केन नर्सरी' या संबंधित पर्यायांची निवड करून अर्ज भरता येणार आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे,पीक प्रात्यक्षिके आणि आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा,यासाठी कृषी विभागाने या योजनांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे.विशेषतः महिला शेतकरी,अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनांचा प्राधान्याने लाभ घ्यावा.
जिल्ह्यातील पात्र शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक संघटना, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी विलंब न करता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. योजनांच्या पात्रता अटी,अनुदान आणि अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी केले आहे.
****************
No comments:
Post a Comment