कुंभमेळा-महाराष्ट्र संस्कृती दर्शवणारे अनोखे निमंत्रण
राष्ट्रपतींना सादर करण्यात आलेले निमंत्रण वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक संकल्पनेवर आधारित आहे. निमंत्रण पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय (पॉप-अप) कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा, पवित्र गोदावरीचा महिमा आणि भारतीय परंपरेतील कुंभमेळ्याचे अनन्यसाधारण महत्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी नॅचरल्सच्या उत्पादनांचा या भेटवस्तू संचात समावेश आहे. अगरबत्ती, भरडधान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू आणि वनमध अशा विविध उत्पादनांतून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि स्थानिक उद्योजकतेचे सामर्थ्य समोर येते. आदिवासी कारागिरांचे कौशल्य, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न आणि समुदायांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेल्या येवला येथील पैठणीचा या संचात समावेश करण्यात आला आहे. नाशिकच्या कृषिसमृद्धीचे प्रतिनिधित्व काळ्या मनुका आणि काजू या उत्पादनांद्वारे करण्यात आले आहे. नाशिकच्या खाद्यपरंपरेचे प्रतीक असलेल्या चिवड्याचाही या संचात समावेश आहे. यासह निवडक मिठाई आणि सुकामेव्याच्या पदार्थांचाही या भेटवस्तू संचात समावेश आहे.
No comments:
Post a Comment