मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ साडेतीन वर्षात पूर्ण करावी
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मंजुरी
· १८.४० किमी मार्गावर एकात्मिक उड्डाणपुलासह १२ उन्नत स्थानकांचा समावेश
· प्रकल्प खर्च १३ हजार ८५६.३७ कोटी रुपये अपेक्षित
मुंबई, दि. २७ : मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) या भागाला जोडणाऱ्या १८.४० किमी लांबीच्या मुंबई मेट्रो लाईन १२ -अ ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली. हा मार्ग पुढील साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयातील मंत्रिमंडळ कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.
मेट्रो मार्गिका १२ अ मुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढण्याबरोबरच कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांमधील वाहतूक जोडणी अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे ही मार्गिका साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच राज्यातील जी मेट्रोची कामे सुरू आहेत, त्या कामांचा वेग वाढवून ती वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटामार्गे) प्रस्तावित मेट्रो मार्गिका १२ अ या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मंजुरीसाठी सादर केला होता. या मार्गिकेमुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत ४० ते ५० टक्के प्रवासवेळ वाचणे अपेक्षित असल्याचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment