जवाहर नवोदय विद्यालयाच्या नववी व अकरावी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
१० एप्रिल २०२७ रोजी तुळजापूर येथे प्रवेश परीक्षा
धाराशिव,दि.१७ ऑक्टोबर (जिमाका) ग्रामीण भागासह जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या पीएम श्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मधील इयत्ता नववी व अकरावीच्या लेटरल एन्ट्री प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२६ होती.आता विद्यार्थ्यांना २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळाली आहे.
इयत्ता नववी व अकरावीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा शनिवार, दि.१० एप्रिल २०२७ रोजी तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे घेण्यात येणार आहे.या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी नववीच्या लेटरल एन्ट्री प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.इयत्ता आठवीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.iny/2026/
ऑनलाइन अर्ज भरताना क्षेत्र, श्रेणी,दिव्यांगत्व किंवा लिंग यासंबंधीच्या माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यासाठी याच संकेतस्थळावर दुरुस्ती विंडो खुली राहणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अकरावीच्या लेटरल एन्ट्री प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
अकरावीच्या प्रवेश परीक्षेसाठी https://cbseitms.nic.in/2026/
अर्जामधील क्षेत्र,श्रेणी,दिव्यांगत्व त्व किंवा लिंग यासंबंधीच्या माहितीत आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित संकेतस्थळावर दुरुस्ती विंडो उपलब्ध राहणार आहे.
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज विहित मुदतीत भरावेत.तसेच संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेबाबत माहिती देऊन अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे,असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती.सुधा साळुंके आणि उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दत्तात्रय लांडगे यांनी केले आहे.
*दर्जेदार शिक्षणाची संधी*
पीएम श्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय,धाराशिव हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई),नवी दिल्लीशी संलग्न असलेले निवासी विद्यालय आहे. या विद्यालयात शिक्षण घेण्याची संधी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे.त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने या प्रवेश प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष देऊन निर्धारित मुदतीत ऑनलाइन अर्ज भरावेत.
प्रवेश परीक्षेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शन आवश्यक असल्यास परीक्षा प्रमुख डी.डी. राऊत यांच्याशी ८८६२००८१९० या क्रमांकावर,तर सहायक परीक्षा प्रमुख एस.आर.गज्जम यांच्याशी ९९२१७३०३५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी नववी व अकरावीच्या लेटरल एन्ट्री प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करून या शैक्षणिक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ए.एस.कांबळे यांनी केले आहे.
***************
No comments:
Post a Comment