चालक आणि सुरक्षित प्रवासासाठी ‘नशामुक्त एसटी महामंडळ’ अभियान
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
· 2026 ते 2029 या कालावधीत मद्य व अंमली पदार्थ तपासणीला व्यापक स्वरूप
· अंमली पदार्थांच्या प्राथमिक तपासणीसाठी विशेष किटचा प्रायोगिक वापर
· चालक आणि वाहकांच्या ड्रग सेवन तपासणीसाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नाते
1 लाख रूपयांची देणगी जाहीर
मुंबई, दि. ११ : रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी मद्य व अंमली पदार्थ तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. सन २०२६ ते २०२९ या कालावधीत विविध प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस एसटी महामंडळ तसेच परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्यासोबतच जनजागृती, नियमित तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार व पुनर्वसन यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. सुरक्षित वाहतूक व्यवस्था ही शासनाच्या प्राधान्यक्रमांपैकी एक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरक्षित आणि सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून या ‘नशामुक्त एसटी’ या मोहिमेच्या माध्यमातून चालक आणि वाहकांच्या ड्रग सेवन तपासणीसाठी 1 लाख रूपयांची देणगी देऊन त्याद्वारे तपासणी मशीन खरेदी करण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी जाहीर केले.
No comments:
Post a Comment