Tuesday, 15 September 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी ३ लाख ५५

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत

आधार प्रमाणीकरणासाठी ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

·       शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन

 

मुंबई, दि. ११ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

 

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, ही यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय  प्रसिद्ध करण्यात आली असून, ती संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतींमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

 पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर १० हजार ११४ कोटी ९० लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामध्ये ७ ऑगस्ट २०२६ रोजी ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २८ कोटी ६० लाख रुपये, तर २४ ऑगस्ट २०२६ रोजी ६ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

 

दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१ लाख १७ हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने संगणकीय प्रक्रियेद्वारे निश्चित केलेल्या १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केली होती.

 

राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या हेअर कटधोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.

 

योजनेतील पात्र मृत शेतकरी, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.

 

विभागनिहाय पात्र लाभार्थी

दुसऱ्या यादीतील विभागनिहाय लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :

छत्रपती संभाजीनगर विभाग १ लाख ९५ हजार ८९९

अमरावती विभाग ७१ हजार ७९६

नागपूर विभाग ३४ हजार ५२०

नाशिक विभाग २५ हजार ४७१

पुणे विभाग २३ हजार ११७

कोकण विभाग ४ हजार ८११

पात्र शेतकऱ्यांनी संबंधित यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

 


 

वृत्त क्र. 3544

जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलासमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष मुलाखत

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्रच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी

 

            मुंबई, दि. ११ : राज्यातील युवक आणि युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्रया महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे  राज्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, उद्योग आणि रोजगाराच्या संधी यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या शासनाच्या प्रयत्नांबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जय महाराष्ट्रआणि दिलखुलासया कार्यक्रमांतून विशेष संवाद साधला आहे.

 

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमातून ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. तसेच दिलखुलासकार्यक्रमातून दि. १६ व १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल ॲपवर या मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या विशेष मुलाखतीचे निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.

 

अधिकृत समाजमाध्यमे :

 X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

 Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

राज्यातील युवांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळवून देणे तसेच युवकांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, हा या रोजगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. येत्या  दि.२९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून, या माध्यमातून युवकांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी, उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ आणि कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या शक्यता उपलब्ध होणार आहेत.

 

या विशेष मुलाखतीत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र"ची  संकल्पना, त्याचे नियोजन, युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी, उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्यविकास, स्वयंरोजगार व उद्योजकतेला प्रोत्साहन आणि राज्यातील भविष्यातील रोजगारनिर्मितीची दिशा याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. युवक व युवतींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi