लोकसंवाद’ अभियानातून गणेशोत्सवात शासकीय योजनांचा जागर
चिंचपोकळी, लालबाग, भायखळ्यातील गणेश मंडळांतील नागरिकांशी थेट संवाद
मुंबई, दि. 19 : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात शासकीय योजनांची माहिती थेट गणेशभक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद’ अभियानाला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून चिंचपोकळी, लालबाग आणि भायखळा परिसरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक जनजागृती उपक्रमांची माहिती देण्यात आली.
शुक्रवारी आयोजित या उपक्रमात इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, तसेच नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती गणेशभक्तांना देण्यात आली.
ओबीसींच्या योजनांची माहिती
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ओबीसी समाज घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती ओबीसी कल्याण विभागाचे मुंबई शहरचे सहायक संचालक रविकिरण नाईक आणि विभागीय माहिती अधिकारी धोंडिराम अर्जुन यांनी दिली. नागरिकांना योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले.
No comments:
Post a Comment