आजी-आजोबांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी;
शाळांमध्ये ‘जीपीटीएम’ बैठकीचे आयोजन
- १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ शपथ; राज्यातील शाळा-महाविद्यालयांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन
मुंबई, दि. २९ : आजी-आजोबांचे अनुभव, ज्ञान आणि संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह आंतरपिढी संवादाला चालना देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ऑक्टोबर रोजी ‘आजी-आजोबा, शिक्षक व मुले’ (जीपीटीएम) बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याबाबत शाळा व महाविद्यालयांमध्ये शपथ घेण्यात येणार आहे. राज्यातील शाळा-महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आणि समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.
राज्याच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन निर्णय, ९ जुलै २०१८ मधील तरतुदीनुसार दरवर्षी १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी तसेच त्यांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ८ मे २०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक शैक्षणिक वर्षातील कोणत्याही एका पालक-शिक्षक बैठकीऐवजी ‘आजी-आजोबा, शिक्षक व मुले’ (जीपीटीएम) बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शिक्षण विभाग तसेच समाजकल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याबाबत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे. तसेच शाळांमध्ये आजी-आजोबा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या जीपीटीएम बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनातील अनुभव, ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्ये विद्यार्थ्यांशी संवादातून व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि युवा पिढी यांच्यातील संवाद वाढविणे, ज्येष्ठांच्या अनुभवांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणे तसेच ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या नातवंडांच्या शाळेत उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment