चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर, दि. 27:- चर्मकार समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअनुषंगाने नागपूर जवळील बाबुळखेडा परिसरात श्री संत रविदास महाराजांचे स्मारक व सभागृहाच्या बांधकामासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा यासाठी अद्ययावत ई-लायब्ररी सुरू करण्यात येईल. श्री संत रविदास महाराजांच्या 650 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यस्तरीय कार्यक्रमांचे व्यापक आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात स्व. श्रीमती भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चर्मकार सेवा संघाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. आमदार कृष्णा खोपडे, महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैयासाहेब बिघाने यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 65 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या 495 गुणवंत विद्यार्थ्यांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चर्मकार समाजातील नागरिकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
शिक्षणासोबतच तरुणांच्या रोजगारावर भर देताना मुख्यमंत्र्यांनी 'लिडकॉम' अर्थात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची नव्याने बांधणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. 'बार्टी' आणि 'आर्टी'च्या धर्तीवर लिडकॉमची नव्याने बांधणी करून चर्मकार समाजातील मुलांसाठी प्रशिक्षण तसेच तत्सम सेवासुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
शिक्षणानेच समाजाचा खरा विकास आणि शाश्वत प्रगती शक्य आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही केवळ औपचारिकता नसून काळाची गरज आहे. श्री संत रविदास महाराजांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचवणे हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
No comments:
Post a Comment