Wednesday, 16 September 2026

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराच्या उभारणीकरिता गतीने नियोजन करणार

 प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराच्या उभारणीकरिता

 गतीने नियोजन करणार

- पणन मंत्री जयकुमार रावल

प्रकल्पामुळे शेतमाल निर्यातीला नवी दिशा; रोजगारनिर्मितीही मोठ्या प्रमाणात होणार

 

मुंबई, दि. १५ : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजाराच्या उभारणीला गती देण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. वाढवण बंदराच्या निकटतेचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील शेतमालाला जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे पोहोचविण्यासाठी दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्प राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारव्यवस्थेशी जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी गतीने नियोजन करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

 

बैठकीस भारतातील विविध राज्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पणन मंडळांना समन्वयित करणाऱ्या कौन्सिल ऑफ स्टेट ॲग्रीकल्चरल मार्केटिंग बोर्ड्सचे कार्यकारी संचालक डॉ. जे. एस. यादव उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक आमदार चरणसिंह ठाकूर, पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरेडॉ. अमोल यादव यांच्यासह व संबंधित अधिकारीही बैठकीस  उपस्थित होते.

 

यावेळी पणन मंत्री रावल म्हणाले की, दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्पाद्वारे शेतमालाची खरेदी-विक्री, प्रतवारी, पॅकेजिंग, शीतसाखळी, साठवणूक, गुणवत्ता तपासणी, ई-लिलाव, कंटेनर वाहतूक आणि निर्यात सुलभता अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा तसेच देशातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय कृषी  बाजार  विकसित करण्यात येईल. त्यामुळे शेतमालाच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना दर्जानुसार अधिक चांगला भाव मिळण्यास मदत होईल.

 

वाढवण बंदरापासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर सुमारे १४०० एकर परिसरात उभारण्यात येणारा हा प्रकल्प फ्रान्समधील रुंगीस मार्केट, नेदरलँड्समधील रॉयल फ्लोरा हॉलंड तसेच रॉटरडॅम बंदर परिसरातील आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय चीन, दक्षिण आफ्रिका या देशांतील उत्तम मार्केटसचा अभ्यास करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. दापचरी बाजाराला वाढवण डीपवॉटर पोर्टसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे संपर्क तसेच प्रस्तावित बुलेट ट्रेन यांची जोड मिळणार आहे. या सक्षम लॉजिस्टिक जाळ्यामुळे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले तसेच प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वेगवान व किफायतशीर होईल, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi