वरळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ
आज सकाळपासूनच गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष आणि उंचच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी' उत्सवात प्रतिकात्मक दहीहंडी फोडून शुभारंभ केला. दहीहंडीतून निघालेले 'नशामुक्त महाराष्ट्र' मोहिमेचा संदेश देणारे बॅनर यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी प्रदर्शित केले.
यानंतर वरळी येथे जांबोरी मैदानावरील परिवर्तन फौंडेशन आयोजित दहीहंडी' उत्सव प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. दहीहंडी उत्सवातून युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. दहीहंडीच्या थरारात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. गोविंदा पथकांनी उंच थर रचताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी आयोजकांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह लोकप्रतिनिधी, गोविंदा पथके व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment