Wednesday, 30 September 2026

पालघर जिल्ह्याला दुष्काळ यादीत समाविष्ट करा –आमदार विलास तरे

 पालघर जिल्ह्याला दुष्काळ यादीत समाविष्ट करा – आमदार विलास तरे

# आठही तालुक्यांचे फेरसर्वेक्षण करा, मदत-पुनर्वसन, कृषी व महसूल मंत्र्यांना निवेदन

मुंबई / पालघर. (प्रतिनिधी) – खरीप हंगाम 2026 मध्ये पावसाच्या अनियमिततेचा आणि दीर्घ खंडाचा भातशेतीला बसलेला फटका लक्षात घेऊन पालघर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त क्षेत्रांच्या यादीत समावेश करावा, अशी जोरदार मागणी बोईसरचे आमदार विलास तरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा जाधव पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेट घरून लेखी निवेदन देऊन राज्य सरकारकडे केली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील प्रत्यक्ष पीकस्थितीचे तातडीने फेरसर्वेक्षण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नुकतेच मदत व पुनर्वसन विभागाच्या दि.25 सप्टेंबर 2026 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांचा ‘ट्रिगर-1’ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा या यादीत समावेश झालेला नसल्याकडे आ. तरे यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असून भात हे येथील प्रमुख खरीप पीक आहे. त्याचबरोबर नागली, वरी, ज्वारी, उडीत, तीळ, व इतर पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बहुतांश भातशेती पावसावर अवलंबून आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार व अतिवृष्टीमुळे पेरणी आणि लागवडीवर परिणाम झाला. त्यानंतर ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने दीर्घ खंड दिल्याने भातपिकाला फटका बसला. काही भागांत दुबार लागवडीचा आर्थिक भारही शेतकऱ्यांवर पडल्याचे आ. तरे म्हणाले.

केवळ एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी विचारात न घेता पावसाचे वितरण, पावसातील खंड, दुबार लागवड, प्रत्यक्ष पीकस्थिती आणि संभाव्य उत्पादनघट यांचे क्षेत्रीय मूल्यमापन करावे, अशी मागणी आमदार विलास तरे यांनी केली आहे. पालघर, वसई, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा या आठही तालुक्यांत कृषी, महसूल व मदत-पुनर्वसन विभागाचे संयुक्त पथक पाठवून गावनिहाय सर्वेक्षण, पंचनामे, छायाचित्रे आणि जी.पी.एस. नोंदी घेण्याची मागणी आ. तरे यांनी केली आहे. त्यानंतर पात्र क्षेत्रांचा दुष्काळ यादीत समावेश करून शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती व मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणी आमदार तरे यांनी केली आहे. “पाऊस किती पडला यापेक्षा पिकाला गरज असताना किती पडला आणि प्रत्यक्ष पीक किती वाचले, याचा विचार झाला पाहिजे. पालघरच्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवू नये,” असे आमदार विलास तरे यांनी म्हटले आहे. “आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदत व सवलतींपासून वंचित ठेवू नये. प्रत्यक्ष पीकस्थितीची फेरतपासणी करून पात्र क्षेत्रांचा दुष्काळ यादीत तातडीने समावेश करावा,” अशी मागणी आमदार विलास तरे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi