चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
· शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य;
· वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे निर्देश
मुंबई, दि. २ - राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये भेट देऊन काम करावे. बैठका आणि आढाव्यांमधील नियोजनाचे प्रतिबिंब शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये दिसले पाहिजे. यासाठी राज्यभर ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे 'ज्ञानमंदिरांचे सशक्तीकरण' ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईतील बालभवन येथे आयोजित शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘शिक्षण संवाद’ या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह विभागातील सर्व संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment