तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे 'इनोव्हेशन हब' बनवेल
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· स्टार्टअपची संख्या आणि क्रियान्वयनमध्ये महाराष्ट्र देशाची राजधान
· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. ३० : वित्त, उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला नेतृत्व देणारा महाराष्ट्र आता स्टार्टअपची संख्या आणि त्याच्या क्रियान्वयन या दोन्ही बाबतींत भारताची स्टार्टअप राजधानी ठरला आहे. हे सामर्थ्य आणि तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला नक्कीच भविष्यात जगाचे इनोवेशन हब बनवेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
एनसीपीए येथील जमशेद भाभा सभागृहात गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयाने आयोजित ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीमधील विजेत्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मित्रा या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य दीपक करंजीकर उपस्थित होते.
स्पर्धेविषयी समग्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल यांनी माहिती दिली. त्यानंतर निवडलेल्या सहा चमूने आपल्या विषयावरील सादरीकरण केले. महाराष्ट्राला २०३५ पर्यंत संशोधनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी नवकल्पनांचा अविष्कार हा या स्पर्धेचा विषय होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिजिटल प्रशासन, शहरीकरण, कृषी, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि नवोन्मेष परिसंस्था या क्षेत्रांमध्ये नव्या पिढीचा दृष्टिकोन प्रशासनात आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
No comments:
Post a Comment