Tuesday, 15 September 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक,माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ संकल्पनेतून सक्षम अंगणवाड्यांवर भर; मुंबईतील ८१७ अंगणवाड्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी करार

 अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

  • माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीसंकल्पनेतून सक्षम अंगणवाड्यांवर भर; मुंबईतील ८१७ अंगणवाड्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी करार

 

            मुंबई, दि. ११      : पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपदान (ग्रॅच्‍युइटी) देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

            एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ माहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला. यंदाचा पोषण माह माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीया संकल्पनेवर आधारित आहे.

 

            यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, सहआयुक्त संगिता लोंढे, विजय क्षीरसागर, आयुषचे सहायक संचालक सुश्रृत मुक्कावार यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

            माहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, पोषण माहाच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आहार व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास, आरोग्य आणि आयुष विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जन्मापासूनच योग्य पद्धतीने शिशु अभ्यंग मिळणे आवश्यक असून, त्यांचे महत्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. आयुषच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आवश्यक मार्गदर्शन देऊन ही माहिती मातांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

 

            यंदाच्या माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीया संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिजिटल अंगणवाड्यांमधील स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य व पोषणविषयक व्हिडिओ नियमितपणे दाखवावेत आणि त्यातील माहिती गरोदर व स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi