मराठी भाषा विभागांतर्गत राबविण्यात येणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ सातत्याने पुढे सुरू ठेवण्याचे धोरण असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. मराठी भाषा शिकण्यास इच्छुक असलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी कार्यशाळा घेण्यास कामागार नेते शशांक राव यांनीही सहमती दर्शविली आहे.
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्याबाबत मंत्री सरनाईक म्हणाले की, संबंधित चालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्यात येईल. त्यानंतर आवश्यक असल्यास पुढील तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीत चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. या प्रक्रियेत संबंधित कायद्यानुसार बॅज निलंबनाची कारवाई होऊ शकते; मात्र या तीन महिन्यांच्या कालावधीत बॅज रद्द केला जाणार नाही. त्यानंतरही मराठी भाषा शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
मुंबई आणि ठाणे परिसरातील वातावरण बिघडविण्याचा काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे सांगून मंत्री सरनाईक यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी आणि नेत्यांशी शासन सातत्याने संवाद साधत असून, त्यांच्या सूचनांचा विचार करून कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही, अशी शासनाची भूमिका असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी शेवटी सांगितले.
No comments:
Post a Comment