रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम या पुढेही सुरू राहणार
· रोजगार हिरावून घेणारे नव्हे, रोजगार देणारे शासन; अफवांवर विश्वास ठेवू नका
· मराठी शिकण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी
· मराठी भाषा अभियान पुढेही सुरू राहणार
मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रात रिक्षा व टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या उद्देशाने परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या 105 दिवसांच्या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातील सुमारे 1 लाख 65 हजार 800 रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम या पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेस कामगार नेते शशांक राव तसेच कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण या उपक्रमाला रिक्षा-टॅक्सी चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृतीचा आदर राखण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना अद्याप मराठी भाषेचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई या भागांतील प्रशिक्षण केंद्रांची यादी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रांची माहिती मिळण्यासाठी आरटीओच्या माध्यमातून स्वतंत्र संपर्क क्रमांक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment