मुंबई वॉटर मेट्रो, दिघी ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर, रेडिओ क्लब, मांडवा जेट्टीसह विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना येणार गती
मुंबई, दि. 13 : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, जलवाहतूक व्यवस्था सक्षम करणे, जहाजबांधणी उद्योगाला चालना देणे, बंदरे व जेट्टींच्या सुविधा आधुनिक करणे तसेच किनारी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. मंडळाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकासही संचालक मंडळाने मान्यता दिली.
मंडळाच्या मालमत्ता आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करून महसूलवाढीचे नवीन स्रोत निर्माण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागांचा नियोजनबद्ध वापर, भाडेतत्त्वावरील सुविधा आणि इतर महसूलवर्धक उपक्रमांमधून मंडळाची आर्थिक क्षमता मजबूत कराव्यात. सागरी मंडळाला आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. महसूल वाढीसाठी नवीन योजनांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश मंत्री श्री. राणे यांनी दिले.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. जलमार्गाचा अधिकाधिक वापर करून मुंबई आणि एमएमआरमधील वाहतुकीला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. निविदा प्रक्रिया नियमबद्ध, पारदर्शक आणि स्पर्धात्मक पद्धतीने राबविण्याच्या सूचना मंत्री श्री. राणे यांनी केल्या
No comments:
Post a Comment