जलसंधारणातून घडवूया बारमाही हरित महाराष्ट्र
पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हीच आजच्या महाराष्ट्राची सर्वात मोठी गरज आहे. म्हणूनच यंदा २१ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जलसंधारण दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकसहभागाची नवी सुरुवात ठरली पाहिजे.
महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २१ ऑगस्टला दरवर्षी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचे स्मरण आणि जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. या दिवशी जलपूजन, विविध जलसंधारण कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, श्रमदान, जनजागृती, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात जलसंधारण दिनाच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ घेऊन या लोकचळवळीची सुरुवात करण्यात आली. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’, रील्स स्पर्धा, जलपूजन, श्रमदान आणि जनजागृतीचे उपक्रम नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आयोजित केले जात आहेत.
No comments:
Post a Comment