विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी
· मुंबईच्या पुनर्विकास, पायाभूत सुविधा, रेल्वे आणि केंद्र सरकारच्या जमिनींवरील प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा
नवी दिल्ली, दि. ४ : मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्ट, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वेच्या मालकीच्या जमिनींसंदर्भातील प्रलंबित प्रश्न, सॉल्ट पॅन जमिनींचा विकास तसेच मुंबईच्या पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्लीत विविध केंद्रीय मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर अहिर प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल तसेच केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.
या संदर्भात माध्यम प्रतिनिधींना माहिती देताना सचिन अहिर म्हणाले की, विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट घेणे हा संसदीय परंपरा आणि शिष्टाचाराचा भाग आहे. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली.
No comments:
Post a Comment