Saturday, 22 August 2026

मराठी-गुजराती साहित्यिक आदान-प्रदानातून ‘नटसम्राट’चे गुजराती नाट्यरूपांतर

 मराठी-गुजराती साहित्यिक आदान-प्रदानातून नटसम्राटचे गुजराती नाट्यरूपांतर

 

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने मराठी-गुजराती साहित्यिक व सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित अजरामर मराठी नाटक नटसम्राटचे गुजराती भाषेतील नाट्यरूपांतर प्रथमच रंगभूमीवर सादर करण्यात येणार आहे.

 

या गुजराती अनुवादित नाटकाचा पहिला प्रयोग शनिवार, 22 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता लघु नाट्यगृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. हा पहिला प्रयोग केवळ निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

 

या विशेष उद्घाटन समारंभास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच पॉप्युलर प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक रामदास भटकळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांच्या हस्ते या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

 

नटसम्राटहे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी नाटक असून, कलाकाराच्या आयुष्यातील संघर्ष, मानवी नातेसंबंध, यश-अपयश आणि भावभावनांचे प्रभावी चित्रण या नाटकातून करण्यात आले आहे. कुसुमाग्रज लिखित हे नाटक मराठी साहित्य आणि रंगभूमीचा अमूल्य ठेवा मानले जाते.

 

१९७० मध्ये प्रकाशित झाल्यानंतर नटसम्राटने मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड निर्माण केला. गेल्या पाच दशकांहून अधिक काळात या नाटकाचे हजारो प्रयोग झाले असून, अनेक पिढ्यांतील रसिकांनी या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले, मोहन जोशी आणि विक्रम गोखले यांसारख्या दिग्गज कलाकारांनी गणपतराव बेलवलकर ही भूमिका साकारून नाटकाच्या लोकप्रियतेत मोलाची भर घातली.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi