म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;
सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
· म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;
· पुणे, शिरूर, खराबवाडी, दापोडी, रोहकल, म्हाळुंगे-इंगळेसह सांगलीतील प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत. शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा आणि धोरणात्मक विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सांगली जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष हे दूरदृश्य प्रणालीद्वारे, तसेच म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे आणि पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाची घरांची लॉटरी लवकरात लवकर जाहीर करावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी. दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा लॉटरीत प्रतिसाद न मिळालेल्या सदनिकांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर तातडीने विक्री करावी, जेणेकरून रिक्त घरे पडून राहणार नाहीत आणि इच्छुक नागरिकांना त्वरित घरे उपलब्ध होतील.
विद्यार्थी तसेच नोकरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या महिलांच्या गरजा लक्षात घेऊन वर्किंग वुमन हॉस्टेल आणि विद्यार्थी वसतिगृहे भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम म्हाडामार्फत राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment