बाल कला अकादमी, नागपूर व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर द्वारा आयोजित नागपूर नगरीत प्रथमच राज्यस्तरीय खासदार चषक अंतरशालेय देशभक्ती समूह गान स्पर्धेत १५ जुलै पर्यन्त सहभागी व्हा !
· महाराष्ट्रातील सर्व शाळांना आयोजन समितीचे आवाहन
· नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने सलग पाचव्या वर्षी आयोजन
· नागपूर जिल्हयाबाहेरील स्पर्धकांना प्रवास भत्ता, नि:शुल्क निवास व्यवस्थेची सोय
· विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे
नागपूर, ता. १० : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय खासदार चषक आंतरशालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख १५ जुलै २०२६ असून प्रवेश निश्चित करण्यासाठी इच्छुक शाळांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन बालकला अकादमी नागपूरच्या अध्यक्ष सौ. मधुरा सारंग गडकरी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूरचे अध्यक्ष श्री रवींद्र फडणवीस यांनी केले आहे.
ही राज्यस्तरीय आंतरशालेय देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा दोन गटांमध्ये इयत्ता १ ते ५ (गट अ) आणि इयत्ता ६ ते १० (गट ब) आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक गटात किमान १० व कमाल १५ स्पर्धकांचा समावेश असणे अनिवार्य आहे. प्रत्येक समूहाने दोन देशभक्तीपर गीते सादर करणे अनिवार्य राहील. त्यातील एक देशभक्तिपर गीत शाळेने निवडायचे असून दुसरे गीत मात्र आयोजन समितीने दिलेल्या गीतांपैकीच एक असणे आवश्यक राहील. गीते मराठी किंवा हिंदी भाषेत सादर करावी लागतील.
स्पर्धेतिल प्रत्येक गटासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्याबाहेरील चमुला प्राथमिक फेरीसाठी ५००० रुपये प्रवास भत्ता देण्यात येईल, तसेच निवास व भोजनाची सोय आयोजकांकडून केली जाणार आहे. प्राथमिक फेरीतून प्रत्येक गटातील १० समूह अंतिम फेरीसाठी निवडले जातील. अंतिम फेरीसाठी बाहेरील चमूंना १०,००० रुपये प्रवास भत्ता देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही निवास व भोजनाची व्यवस्था केली जाईल.
सहभागी प्रत्येक चमूला प्रशस्तीपत्र देण्यात येईल. अंतिम फेरीतील विजेत्या चमूतील प्रत्येक स्पर्धकाला रोख पारितोषिक देण्यात येईल तसेच विजेत्या चमूला “खासदार चषक” प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ३ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून त्या दिवशी गट अ (इयत्ता १ ते ५) साठी प्राथमिक फेरी होईल, तर गट ब (इयत्ता ६ ते १०) साठी ४ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ १६ ऑगस्ट २०२६ रोजी वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 जुलै 2026 पर्यंत प्रवेश स्वीकारले जातील.
ही स्पर्धा बालकला अकादमी नागपूर आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी सौ. मीनल बाविस्कर (मो. 8482874505) व सौ. प्रिया आत्राम (मो. 7020714385) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment