सहकाराची नवी क्रांती
'भारत टॅक्सी'मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई, दि. 23 :- सहकाराची नवी क्रांती 'भारत टॅक्सी' हा प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात 'भारत टॅक्सी' (BHARAT TAXI) सेवेचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
या सेवा शुभारंभ सोहळयास केंद्रीय राज्यमंत्री (सहकार आणि नागरी विमान वाहतूक, भारत सरकार) मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य दिपक तावरे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त सौरभ राव, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग आदिनाथ दगडे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, लोकनेते दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त परिवहन सहाकारी संस्थेचे सदस्य रामशेठ ठाकूर, सहकार टॅक्सी को-ऑप. लि. चे चेअरमन डॉ. जयेन मेहता, रुपेश धुमाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्प अर्पण करुन मानवंदना दिली.
No comments:
Post a Comment