Monday, 27 July 2026

ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त

 ठाणे जिल्ह्यातील रेड व ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार

-पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबई,: ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड व ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

 

याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रमोद जठार, अनिल परब, ज्ञानेश्वर म्हात्रे, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

 

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) मध्ये मनुष्यबळ वाढविण्याची प्रक्रिया सुरू असून, आवश्यकतेनुसार नियमित व कंत्राटी पदांवर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून, एमपीसीबीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

बँक गॅरंटीच्या संदर्भात कोणताही गैरप्रकार आढळलेला नसल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि खाते ते खात्याद्वारे होत असल्याने अनियमिततेची बाब निदर्शनास आलेली नाही.

 

कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) ही व्यवस्था सहकार विभागाऐवजी एमआयडीसीमार्फत चालविली जाते. लहान आणि मध्यम उद्योगांना स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे सामूहिक प्रक्रिया केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये हीच पद्धत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. समित्यांच्या सुनावण्या अधिक पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाइन किंवा इन-कॅमेरा पद्धतीने घेण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi