मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी
कंपनी स्थापन करण्यात येणार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 3 : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यानी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
प्रसारभारती समवेत झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस सांगितले की, सध्या या जागेवर एनडीझेड आणि सीआरझेडचे नियम लागू असल्याने केवळ मर्यादित क्षेत्रावर विकास शक्य आहे. संपूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल.
या संयुक्त विकासासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता प्रकल्पाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करून डीपीआर आणि तांत्रिक बाबींना गती देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यसमिती स्थापन करावी. तसेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील सर्व घटक आणि विकास आराखडा अंतिम करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
No comments:
Post a Comment