बेस्टच्या जमिनी विकणार नाही
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या विकास प्रक्रियेत बेस्टच्या मालकीच्या जमिनी विकल्या जाणार नाहीत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर वित्तीय भागीदारांच्या मदतीने या जागांचा विकास केला जाईल. जमीन आणि मालमत्तेची मालकी बेस्टकडेच राहणार असून दीर्घकालीन भाडेपट्टा मॉडेलद्वारे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मुंबईकरांना परतावा देणारा विकास हा या प्रकल्पाचा मुख्य गाभा आहे. प्रत्येक डेपोचा विकास केवळ व्यावसायिक उपयोगापुरता मर्यादित न ठेवता तेथे संग्रहालये, क्रीडा सुविधा, सांस्कृतिक उपक्रम आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधा उभारण्याचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकल्प शहराच्या सामाजिक जीवनाला चालना देणारा ठरेल. याच अनुषंगाने निवडक डेपोमध्ये मराठी चित्रपटांसाठी समर्पित ३०० ते ४०० आसनक्षमतेची चित्रपटगृहे उभारण्याच्या संकल्पनेचाही विचार करण्यात यावा. अशा चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना सवलतीच्या दरात स्क्रीन उपलब्ध करून देता येतील. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जीवनमानाचा विचार करून आधुनिक निवासी संकुलांची देखील उभारणी करण्यात यावी.
No comments:
Post a Comment