एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार
– मंत्री आदिती तटकरे
एकल महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
मुंबई, दि. २३ : राज्यातील अंदाजे ५० ते ५५ लाख एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्र व व्यापक धोरण राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यांच्या हितसंवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
महिला व बाल विकास विभाग, मुंबई शहर यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एकल महिला दिन’ तसेच प्रस्तावित ‘एकल महिला धोरण’ यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी एकल महिला धोरणाचे महत्त्व, कार्यशाळेची उद्दिष्टे आणि धोरण निर्मितीची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेत विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विभागाच्या लाभार्थी महिला तसेच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment