रायगडमधील प्रलंबित रस्ते कामांना गती द्या
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन तातडीने पूर्ण करावे
– मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 10 : रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रलंबित रस्ते आणि पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया गतिमान करावी. गाव नकाशावर असलेल्या रस्त्यांच्या कामांची सद्य:स्थिती दर्शविणारा सविस्तर अहवाल सादर करावा; तसेच गाव नकाशावर नोंद नसलेल्या प्रलंबित रस्त्यांचे मोजमाप आणि आवश्यक सर्वेक्षणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्ते विकासाच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गतचे रस्ते, पाणंद आणि प्रलंबित रस्ते विकास कामांचा; तसेच राष्ट्रीय महामार्ग कोशिंबळे मार्गाशी संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, लोकसंख्या एक हजारपेक्षा अधिक असलेल्या गावांमधील रस्ते विकास कामांना प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासाच्या मुख्य प्रवाहाशी गावांचा संपर्क अधिक सक्षम व्हावा, यासाठी रस्ते प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment