राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांची
नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेची वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत वाढविण्यास तत्त्वतः मान्यता
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) केंद्रीय अतिरिक्त सचिव व व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक (भाप्रसे.) यांची कर्तव्य भवनमध्ये भेट घेतली. २०२६-२७ च्या कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्यांतर्गत (पीआयपी) निधी मंजुरी तसेच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्त्वाची ठरली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी बालकांची वयोमर्यादा दोन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढविण्यास या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील अधिकाधिक मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आशा स्वयंसेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या दैनंदिन कामकाजातील विविध ऑनलाइन नोंदी, अहवाल सादरीकरण व आरोग्यविषयक माहितीचे डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी आशा स्वयंसेविकांना मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आशा स्वयंसेविकांचे प्रोत्साहनपर मानधन वेळेत वितरित करण्यासाठीही केंद्र शासनाकडून निधी वेळेवर मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
No comments:
Post a Comment