ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
· वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचा निर्णय
· क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी 'व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट' घोषित करणार
ठाणे, दि. ५: ठाणे शहरातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना तत्काळ दिलासा मिळावा यासाठी क्लस्टर योजनेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेटमधील क्लस्टर योजना जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी ही योजना महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे हस्तातंरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ठाणे एमआयडीसीची ६०.७२ हेक्टर जमीन क्लस्टर पुनर्वसन प्रकल्पासाठी लवकर हस्तांतरित करण्याचे निर्देश देतानाच ठाणे जिल्ह्यातील क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांना 'व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट' घोषित करणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे समूह विकास प्रकल्प आणि एमआयडीसीबाबत आढावा घेतला. ठाणे समूह विकास प्रकल्प आता ‘महाप्रीत’ ऐवजी एमएसआरडीसीकडून करण्यात येणार असल्याचे सांगत या बदलासाठी आवश्यक असणारी हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
ठाणे समूह विकास प्रकल्प हा देशातील पहिला भव्य समूह विकास प्रकल्प असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे शहराचा हा समूह विकास प्रकल्प नागरिकांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळवून देणारा ठरेल. हा केवळ एक गृहनिर्माण प्रकल्प नसून, नागरिकांचे जीवनमान उंचावणारा समूह विकास प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment