विधानभवन परिसरातील गर्दी नियंत्रित करण्यास तसेच सुरक्षा,
डिजिटल प्रवेशपास व्यवस्थेला प्राधान्य
मुंबई, दि. १५ : आगामी पावसाळी अधिवेशन २०२६ सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्धरित्या पार पडावे या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामकाज करावे. पावसाची शक्यता लक्षात घेता सुरक्षित मंडप, सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात कर्मचाऱ्यांसाठी अन्न पाकिटे, स्वच्छ आणि सुसज्ज उपहारगृह याबाबत अत्यंतीक दक्षता घेण्यात यावी. विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन गर्दी नियंत्रित व्हावी यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे, त्याचप्रमाणे डिजिटल प्रवेशपास व्यवस्था सुरु करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
विधानभवन येथे २०२६ च्या दुसऱ्या म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्वतयारीसंदर्भात बैठक विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, वाहनतळ व्यवस्था, अधिवेशन कालावधीतील अनुभवी डॉक्टरांची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा, उपहारगृहामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा, उपहारगृहातील स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणी, विधानभवन परिसरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, अखंडित पाणीपुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा, रेल्वे आरक्षण तसेच आपत्कालीन व्यवस्था या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अधिवेशन कालावधीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली असून प्रवेश नियंत्रण कडक ठेवावे, वाहनतळ व्यवस्था उचित असावी तसेच सुरक्षा, स्वच्छता व आपत्कालीन सेवा पूर्णतः सज्ज ठेवाव्यात, असे स्पष्ट निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
No comments:
Post a Comment