महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरण;
शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत
-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि.५ : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
राज्यात यंदा खरीप हंगाम प्रमाणित बियाणे व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भूईमुग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात तब्बल २ लाख प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे.
योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ३ लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये ६६ हजार ७५० क्विंटल सोयाबीन तसेच ३५ हजार ५०० क्विंटल भूईमूग बियाण्यांचा समावेश असून इतर खरीप पिकांची बियाणेदेखील महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध राहणार आहेत.
No comments:
Post a Comment