अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा
मुंबई, दि. 12 : राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली असून, ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर परिवहन आयुक्त यांनी देखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे.
मंत्री सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे.
या अनधिकृत सेवांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नसून चालकांची पडताळणी, विमा संरक्षण, महिला सुरक्षाविषयक उपाययोजना तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अत्यंत अपुरी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, शासनाच्या परिवहन नियमांचे खुलेआम उल्लंघन करून या ॲप्समार्फत आर्थिक व्यवहार सुरू असल्याने परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर अन्यायकारक परिणाम होत असल्याचे परिवहन विभागाने म्हटले आहे.
सायबर क्राईम विभागाकडे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सचे ऑनलाईन संचालन तात्काळ बंद करणे, संबंधित ॲप कंपन्या, चालक आणि व्यवस्थापनाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा व मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करणे तसेच कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment