Wednesday, 20 May 2026

जागतिक संगीत दिनानिमित्त ‘आरोही’ युवा संगीत महोत्सवाचे आयोजन रवींद्र नाट्यमंदिर येथे २० व २१ मे रोजी शास्त्रीय गायन व

 जागतिक संगीत दिनानिमित्त ‘आरोही’ युवा संगीत महोत्सवाचे आयोजन

रवींद्र नाट्यमंदिर येथे २० व २१ मे रोजी शास्त्रीय गायन व

वाद्यसंगीताची अनोखी मैफल युवा कलाकारांना व्यासपीठ

 

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने जागतिक संगीत दिनानिमित्त ‘आरोही – अ फेस्टिव्हल ऑफ रायझिंग स्टार्स’ या विशेष सांगीतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रेस फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव युवा आणि होतकरू संगीत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम ठरणार आहे.

२००२ पासून सुरू असलेल्या ‘आरोही’ या संगीत महोत्सवाने गेल्या २४ वर्षांत १३८ हून अधिक युवा संगीतकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, गायन आणि वाद्यसंगीताच्या परंपरेला प्रोत्साहन देत नवोदित कलाकारांना प्रेक्षकांसमोर सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.

हा संगीत महोत्सव बुधवार, २० मे २०२६ आणि गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथील मिनी थिएटरमध्ये रंगणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी नागरिकांसाठी ही एक विशेष सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi