वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी
एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा
- वनमंत्री गणेश नाईक
· मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी
· अत्याधुनिक नियंत्रण कक्ष, रेस्क्यू सेंटर, उपचार केंद्रे उभारणार
· रॅपिड रेस्क्यू टीम, दहा ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरही उभारणार
· ग्रामस्थांचा समावेश असलेली दोन हजार प्रतिसाद दले स्थापणार
मुंबई, दि. २६ : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे तसेच दोन रेस्क्यू सेंटर व दहा उपचार केंद्रे उभारण्यास राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष तथा वन मंत्री गणेश नाईक यांनी मंजुरी दिली. हा प्रकल्प सुमारे २६० कोटी रुपयांचा असून मानवांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी यावेळी दिले.
राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठक मंत्रालयात वन मंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार समीर मेघे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी, उपसचिव निकिता पांडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment