सिडकोतर्फे आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) नवी मुंबई येथे प्रस्तावित असून भारत व आफ्रिकन राष्ट्रांमधील आर्थिक, व्यापारी व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे एकात्मिक केंद्र म्हणून हा प्रकल्प संकल्पित आहे. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि संस्थात्मक भागीदारी यांना चालना देण्याच्या उद्देशाने आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन (एआयईएफ) यांच्या सहयोगाने हा प्रकल्प आकारास येणार आहे. ग्लोबल साउथ देशांमधील सहाकार्याकरिता भारताचे नेतृत्व मान्य होत असताना, भारत-आफ्रिकेतील सध्याच्या 96 अब्ज अमेरिकन डॉलर भागीदारीच्या क्षमता अधिक वाढीस लागाव्या याकरिता हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आफ्रिका भारत व्यापार केंद्र हा परिवर्तन घडवून आणणारा प्रकल्प असून याद्वारे भारत-आफ्रिका संबंधांचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून महाराष्ट्र उदयास येणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि संस्थात्मक सहयोग यांकरिता समर्पित परिसंस्था निर्माण करण्यासह या प्रकल्पाद्वारे आफ्रिकन देशांबरोबरचे आर्थिक संबंध बळकट होऊन विकास, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीकरिता नवीन संधी खुल्या होणार आहेत. जागतिक पटलावर महाराष्ट्राला मानाचे स्थान प्राप्त होण्यासह ग्लोबल साउथमधील भारताच्या विस्तारणाऱ्या भूमिकेकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे.
No comments:
Post a Comment