Wednesday, 20 May 2026

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान

 राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान

 

मुंबई, दि. १९ : लोक भवन येथे आयोजित विशेष सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लिडकॉमच्या कारागिरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा उपस्थित होत्या.

 

जागतिक फॅशन ब्रँड प्राडाच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पल कलेला जागतिक स्तरावर पोहोचविण्यात लिडकॉमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच राज्यातील पिढ्यानपिढ्यांचा वारसा जपणाऱ्या कारागिरांसाठी नवीन रोजगार आणि जागतिक बाजारपेठेतील संधी उपलब्ध करून दिली आहे.

 

या सत्कारप्रसंगी कारागीर प्रतिनिधी सौरभ पवार, सतीश सातपुते, विजय शिंदे, तानाजी कांबळे, संभाजी सातपुते, अनिता लोकरे, अरुण चापके, सुरेश आवळे, संदीप रोटे आणि अनिल पवार यांचा सन्मान करण्यात आला.

 

तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, मुख्य वित्त अधिकारी आनंद ऐनवाड, कारखाना व्यवस्थापक अमोल शिंदे, विक्री सल्लागार वैभव खाटे आणि जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांचाही गौरव करण्यात आला.

 

प्राडासोबतचे हे सहकार्य लिडकॉम टीम आणि कारागिरांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चपलाया विशेष प्रकल्पांतर्गत प्राडाने कोल्हापुरी चपलांपासून सँडल्सचा संग्रह जगभरातील ४० निवडक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केला आहे. या सँडल्सची निर्मिती महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांकडून भारतातच केली जात आहे.

 

तसेच प्राडा संस्थेमार्फत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी एनआयएफटी आणि कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ लेदर टेक्नॉलॉजी (केआयएलटी) येथे १८० कोल्हापुरी कारागिरांसाठी तीन वर्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला पूर्ण आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

 

या सन्मानामुळे महाराष्ट्र पारंपरिक कारागिरांचा वारसा जपणारे आणि त्यांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणारे राज्य म्हणून अधिक सक्षमपणे समोर आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi