एआय लिविंग लॅब' उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष
उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केवळ तरुण लोकसंख्या असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ('डेमोग्राफिक डिविडंड') हा तयार होतो. तरुणांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे (उदा. AI, मॅन्युफॅक्चरिंग) प्रशिक्षण देणे आवश्यक असते. हीच बाब ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'स्किल इंडिया' ची चळवळ सुरू केली आणि महाराष्ट्राने त्यात आघाडी घेतली आहे. "पूर्वी भांडवल महत्त्वाचे होते, पण आता गुंतवणूकदार तिथेच जातात जिथे कुशल 'मानव संसाधन' उपलब्ध आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता हे आव्हान पेलण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. काळानुरूप मानव संसाधन तयार करावे लागेल. उद्योगांच्या गरजेनुसार दिवसागणिक कौशल्य प्रशिक्षणात बदल करावे लागतील. आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ 'एआय लिविंग लॅब' सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही अभिनंदनीय बाब आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विद्यापीठाने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने १०,००० महिलांना एआय (AI) ट्रेनिंग दिले आहे. "जॉब मार्केट वेगाने बदलत आहे. पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत कौशल्य विद्यापीठांना अधिक लवचिक राहावे लागेल. आज भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाकडे झेप घेत असताना, या गतीला टिकवून ठेवण्यासाठी केवळ पदवीधर नव्हे, तर 'कौशल्य प्रशिक्षित' तरुणांची गरज आहे. "देशात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा ३१% आहे.महाराष्ट्र जर स्वतंत्र देश असता, तर ती जगातील ३० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती. दावोस परिषदेत नुकतेच ३० लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र युएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र स्टार्ट अप्स आणि युनिकॉर्न मध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment