पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान परिषदेत निवेदन
मुंबई, दि. १७ : राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी पीक पाहणीची प्रक्रिया १०० टक्के पूर्ण होणे आवश्यक असल्याने पीक पाहणीसाठी मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
विधानपरिषदेत निवेदन करताना त्यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतःची पीक माहिती ऑनलाईन अपलोड करावी लागत होती; मात्र विविध कारणांमुळे ही प्रक्रिया काही ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाही. याबाबत सभागृहात तसेच खालच्या सभागृहात सदस्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर शासनाने खरीप हंगामासाठी पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होऊन त्यांना शासकीय लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपली पीक माहिती तात्काळ नोंदवावी, जेणेकरून कोणताही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही.
No comments:
Post a Comment