सायन रुग्णालयाचा पुनर्विकास म्हणजे आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात
– महापौर रितू तावडे
महापौर रितू तावडे म्हणाल्या की, आजचा हा प्रकल्प केवळ इमारतीचा विस्तार नसून आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीमुळे लाखो रुग्णांना उपचार मिळाले असून, ही सुविधा आता नागरिकांच्या हक्काची बनली आहे. या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सायन रुग्णालयात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, हृदयविकार उपचार सुविधा, तसेच वाढीव रुग्णखाटा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णालयाची क्षमता आणि गुणवत्ता दोन्ही वाढणार आहेत. मुंबई महानगरपालिका देशातील एकमेव अशी संस्था आहे जी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय अशा तिन्ही स्तरांवर आरोग्य सेवा पुरवते. दरवर्षी सुमारे ७५ लाख बाह्यरुग्ण आणि २५ लाखांहून अधिक रुग्णांना उपचार दिले जातात. वन सिटी, वन हेल्थ सिस्टीम उभारत असून यामुळे मुंबईतील कोणत्याही महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांना सुलभ आणि समन्वित सेवा मिळेल. तसेच, आरोग्य व्यवस्थेचा खरा विकास केवळ इमारतींमध्ये नसून, सेवाभाव, पारदर्शकता आणि रुग्णांचा विश्वास यामध्ये आहे. प्रत्येक रुग्णामागे एक कुटुंब आणि अपेक्षा असते, त्या पूर्ण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘फाईव्हस्टार सुविधा, पण सर्वांसाठी’ या ध्येयाने महानगरपालिका काम करत आहे.
No comments:
Post a Comment