Wednesday, 18 March 2026

नंदुरबार जिल्ह्यातील गंगापूर जमीन संपादन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान परिषदेत निवेदन

 नंदुरबार जिल्ह्यातील गंगापूर जमीन संपादन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान परिषदेत निवेदन

 

मुंबई, दि. १७ : नंदुरबार जिल्हा येथील नवापूर तालुका अंतर्गत मौजे गंगापूर येथील जमीन संपादन प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.

 

मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, गंगापूर येथील जमीन संपादन प्रकरणात ५ जुलै २०२३ आणि १२ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या मूळ जमीन मालकांच्या यादीत अनुसूचित जमातीच्या व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली होती. तसेच, या प्रकरणात जमिनीची मालकी आदिवासींकडून बिगर आदिवासींकडे बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरित झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. याशिवाय, भू-संपादन निवाड्याशी संबंधित प्रकरणे लवाद व जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असताना फेरनिवाडा करण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते.

 

या पार्श्वभूमीवर, प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी नाशिक विभाग येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आश्वासन विधान परिषदेत देण्यात आले होते. त्यानुसार महसूल विभागामार्फत १० मार्च २०२६ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या प्रकरणात संबंधित सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला असून, संबंधित इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. या चौकशीमुळे गंगापूर जमीन संपादन प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.

००००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi