पर्यावरण संरक्षणासाठी ठोस कृतीची गरज – मंत्री पंकजा मुंडे
पर्यावरण संरक्षणासाठी ठोस आणि व्यापक पातळीवर कृती करण्याचे आवाहन करत पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या की, भूतकाळात विकास आणि पायाभूत सुविधांवर भर देताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. पर्यावरणाचा प्रश्न हा एका प्रदेशापुरता मर्यादित नसून तो जागतिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करताना जागतिक दृष्टीकोन आवश्यक आहे.
माती, पाणी आणि हवा हे पर्यावरणाचे तीन महत्त्वाचे घटक आहेत. औद्योगिकीकरण आणि वाढत्या पायाभूत सुविधांमुळे या तिन्ही घटकांवर ताण निर्माण झाला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास देशांनी विकासासाठी पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या उद्योगांना परवानगी दिली आणि आता त्याची किंमत मोजावी लागत असल्याचे मंत्री श्रीमती मुंडे यांनी नमूद केले.
पर्यावरणविषयक परिषदांमधील चर्चा केवळ बौद्धिक पातळीवर न राहता त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे, अशी आशा व्यक्त करून, मुंबई क्लायमेट वीकमुळे विविध देशांतील तज्ज्ञांशी विचारविनिमयाची संधी मिळाल्याबद्दल श्रीमती मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment