भारतीय 'स्टार्टअप' मध्ये जागतिक आव्हानांवर मात करण्याची क्षमता
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
· भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था
मुंबई, दि. १७ : जगासमोर सध्या बऱ्याच क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्याची क्षमता भारतीय स्टार्टअप मध्ये आहे. भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी ' स्टार्टअप' ची परिसंस्था बनला आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताजमहाल हॉटेल मधील क्रिस्टल सभागृहात आयोजित भारत - फ्रान्स स्टार्टअप मंचच्या कार्यक्रम प्रसंगी काढले. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आणि फ्रान्स पुन्हा जूनमध्ये ' भारत इनोव्हेट्स २०२६' अंतर्गत आयोजित कार्यक्रमात फ्रान्समध्ये एकत्र येणार आहेत. यावेळी हवामान बदल, सुरक्षा, आरोग्य या क्षेत्रात समाधान शोधत असलेले भारतातील ' बेस्ट स्टार्टअप' जगासमोर आणण्यात येतील. अटल इनोव्हेशन मिशन २४ फेब्रुवारी रोजी दशक पूर्ण करणार आहे. या मिशन अंतर्गत १० हजार पेक्षा जास्त टिंकरिंग प्रयोगशाळांच्या माध्यमातून १ कोटीहून अधिक विद्यार्थी स्टार्टअपसोबत कार्यरत आहेत. तसेच १०० हून अधिक इन्क्युबेटर्स आणि अनेक एडटेक स्टार्टअप्स या मोहिमेशी जोडलेले आहेत. यावेळी उपस्थित उद्योजकांना अटल इनोव्हेशन मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले.
No comments:
Post a Comment