Wednesday, 24 September 2025

राज्यात स्वतंत्र एनसीसी अकॅडमी उभारणार

 राज्यात स्वतंत्र एनसीसी अकॅडमी उभारणार

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबई, दि. २३ : राष्ट्रीय छात्र सेने (एनसीसी) च्या प्रशिक्षणासाठी राज्यात लवकरच स्वतंत्र एनसीसी अकॅडमी उभारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण संस्थेसाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात जागा उपलब्ध करुन देण्यासाठीची कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

 

मंत्रालयात ‘एनसीसी’ कार्यान्वयन संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी, उपसचिव सुनील पांढरे, तसेच भारतीय नौदल छात्र सेनेचे संचालक कॅप्टन जेनीश जॉर्ज आदी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान एनसीसी विद्यार्थ्यांनी बनविलेली भारतीय नौदल युद्धनौकेची प्रतिकृती अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. कोकाटे यांना भेट दिली.

 

मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) राज्यातील विद्यार्थी शाळा, कॅम्प, क्रीडा आणि विविध उपक्रमांत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेचे 'सी. सर्टिफिकेट' सैन्यदल, पोलीस दल आणि कॉर्पोरेट क्षेत्रात महत्त्वाचे ठरते. यामुळे अनेक क्षेत्रात एनसीसी विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. एकूणच राष्ट्रीय छात्र सेनेचे योगदान लक्षात घेता भविष्यात महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मंत्री ॲड.कोकाटे यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi