नागपूर विभागातील १,५८२ रुग्णांना
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १३.८१ कोटींची मदत
मुंबई, दि. १२ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मोठा आधार बनला आहे. नागपूर विभागात मागील सात महिन्यांत तब्बल १५८२ रुग्णांना १३ कोटी ८१ लाख २० हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली असल्याने रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा वापर होतो आणि निधी खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.
संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात असून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.
नागपूर विभागातील मदतीचा आढावा
(१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)
जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कम
नागपूर 1396 12,16,82,000
वर्धा 41 39,55,000
भंडारा 31 29,35,000
गोंदिया 50 39,00,000
चंद्रपूर 54 47,48,000
गडचिरोली 9 9,00,000
No comments:
Post a Comment