Thursday, 14 August 2025

विकसित महाराष्ट्र २०४७ करिता मांडलेल्या संकल्पना राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी उपयुक्त

 विकसित महाराष्ट्र २०४७ करिता मांडलेल्या संकल्पना

राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी उपयुक्त

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र २०४७ ; बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग कार्यशाळा संपन्न

 

मुंबई, दि. १३ : विकसित महाराष्ट्र २०४७ - बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग कार्यशाळेत मांडण्यात येणाऱ्या संकल्पना या महाराष्ट्र राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी उपयुक्त आहेत. या कार्यशाळेतील चर्चेतून मांडलेल्या संकल्पना पुढील २०-२५ वर्षांसाठी प्रभावी दस्तावेज तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सह्याद्री अतिथिगृह येथे नियोजन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विकसित महाराष्ट्र २०४७ - बिग आयडियाज ब्रेनस्टॉर्मिंग कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विकसित भारत घडवण्यासाठी महाराष्ट्राने सर्वाधिक चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच नीती आयोगाने महाराष्ट्राबाबत विशेष लक्ष दिले आहे. या संवाद प्रक्रियेतून राज्याच्या विकासाला चालना देणाऱ्या ‘मोठ्या कल्पना’ समोर येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणाले, व्हिजन तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तयारी झाली आहे. मंत्रालयातील विविध विभागाच्या सचिवांसह लाखो लोकांच्या सूचना मिळाल्या आहेत. त्या माहितीतून त्याची प्रकरणे (चॅप्टर्स) तयार झाले असून ते सध्या मसुदा अवस्थेत आहेत. राज्याचे रूपांतर घडवून आणण्यासाठी काही मोठ्या कल्पना, जलद अंमलबजावणी योग्य उपाय सुचवणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. ही चर्चा सचिवांनी आजवर जे काम केले आहे, त्याचाच एक भाग आहे. या सर्व कल्पना एकत्र करून, त्या योजनामध्ये समाविष्ट केल्या जातील आणि त्याचा पहिला मसुदा सादर करण्यात येईल, असे श्री. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.

या कार्यशाळेत रोजगार संधी, पायाभूत सुविधा, सक्षमीकरण आणि जीवनमानाची गुणवत्ता, संस्थात्मक क्षमता आणि सुशासन या प्रमुख चार मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi