नीरा देवधर प्रकल्प, गुंजवणी-चापेट प्रकल्पाचा आढावा;
कामे गतीने करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना
मुंबई, दि. 13 :- नीरा देवधर प्रकल्प, गुंजवणी-चापेट प्रकल्प, वरसगाव, पानशेत व मुळशी धरण प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संग्राम थोपटे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक श्री. गुणाले, मुख्य अभियंता श्री. धुमाळ, मुख्य अभियंता श्री. मिसाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेताना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, वाजेघर, वांगणी, शिवगंगा उपसा सिंचन योजनेचा सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळताच या उपसा सिंचन योजनेची कामे सुरू केली जातील. नीरा देवधर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अंतिम टप्यात असून तेही लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
वरसगाव, पानशेत व मुळशी धरण प्रकल्प बाधितांच्या समस्या बाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महसूल विभागाने या ठिकाणच्या गावठाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव जलसंपदा विभागास सादर करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या.
No comments:
Post a Comment