Saturday, 19 July 2025

शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार

 शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे


विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार


- मंत्री ॲड. आशिष शेलार


 


मुंबई, दि. १७ : राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून राज्यात काही जिल्ह्यांमध्ये "विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र" (SIAC) स्थापन केले आहेत. आता उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये एसआयएसी केंद्रे व २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण ५ वर्षाच्या कालावधीत ही केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत, अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे केली. त्यासाठी राज्य शासनावर अंदाजे १९२ कोटी रुपयांचा आर्थिक भार अपेक्षित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


            भारतीय राज्यघटनेत नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे हे एक मूलभूत कर्तव्य मानले आहे. त्या पार्श्वभूमीवर, शालेय वयातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व कुतूहल वाढविण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत (RGSTC) २०१५ पासून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये "विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र" (SIAC) स्थापन केले आहेत. ही योजना यापुढे आता थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे चालविण्यात येणार आहे.


अशा प्रकारची सर्व केंद्र शालेय शिक्षणाशी संबंधित सक्षम शैक्षणिक संस्था यांच्या भागिदारीतून आणि राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे नेहरु सायन्स सेंटर, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, मुक्तांगण एक्सप्लोरेटरी आणि विज्ञान आश्रम यांच्या सहकार्यातून उभारण्यात आली आहेत. शालेय शिक्षण कार्यक्रमाला हा पूरक कार्यक्रम असून विज्ञान शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास मदत करतो. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, एक विज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम केंद्र उभारणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे, असे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.


एसआयएसी (SIAC) ही उपक्रम योजना ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि NEP-२०२० ला पूरक ठरणारी एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. ही केंद्रे केवळ शाळांसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी ज्ञानवृद्धीचे केंद्र ठरणार आहेत, सर्व जिल्ह्यांमध्ये याचे विस्तार केल्यास भविष्यातील विज्ञानस्नेही महाराष्ट्र घडविणे शक्य आहे. याची अंमलबजावणी व नियंत्रणासाठी एक व्यावसायिक चमू तयार केला जाईल ज्यात क्यूरेटर, अभियंते, व निवृत्त अधिकारी यांचा समावेश असेल. यासाठी केंद्र शासन, राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद व अन्य संस्थांचा सहभाग असेल, असे मंत्री ॲड.शेलार यांनी स्पष्ट केले


काय आहेत उद्दिष्टे


 विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र (SIAC) केंद्रांमधून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव, प्रयोग, मॉडेल्स, रोबोटिक्स, ३० प्रिंटिंग, कोडिंग इत्यादींचा परिचय करून दिला जातो, यामधून वैज्ञानिक समज व कौशल्ये विकसित होतात. कुतूहल, सर्जनशीलता आणि संवाद कौशल्ये वाढतात. शिक्षकांना प्रशिक्षण व शैक्षणिक साधनसामग्रीचा उपयोग मिळतो.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही संधी उपलब्ध होतात.


आत्तापर्यंतची प्रगती


महाराष्ट्र राज्यात विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र आत्तापर्यंत ६ जिल्ह्यांमध्ये वारणानगर, प्रवरानगर, अमरावती, सातारा, बारामती, देवरुक या ठिकाणी सुरु केली असून नांदेड, अकोला व परभणी या ३ जिल्ह्यात केंद्र सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये लाखो विद्यार्थी, शिक्षक व नागरिक सहभागी झाले आहेत. याचे अनुभव सकारात्मक असून विद्यार्थी आणि शिक्षकांकडून विशेष प्रतिसाद लाभला आहे. सदर विद्यार्थी हिताचा उपक्रम संपुर्ण महाराष्ट्रभर पुढील पाच वर्षात प्रत्येक जिल्हास्तरावर राबविण्यात येणार असून तसेच विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदानाबद्दल थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे नाव देवून त्यांच्या कार्यास मानवंदना अर्पित करीत आहोत.


 


सध्या सुरु असलेल्या केंद्राची फलनिष्पत्ती


 


• केंद्राला भेट देणाऱ्यांची संख्या :- २,७६,८३८


• केंद्रात झालेल्या शिक्षक प्रशिक्षणाच्या लाभार्थ्यांची संख्या :- २,७२८


• विद्यार्थीकेंद्रीत कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांची संख्या :- ६०,९८०


 


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये योगदान (NEP २०२०)


 


SIAC केंद्रे NEP-२०२० च्या विविध उद्दिष्टांशी सुसंगत आहेत, जसे कीः


• अनुभवाधिष्ठित व अन्वेषणाधारित शिक्षण


• वैज्ञानिक दृष्टिकोन व नवोपक्रमांना चालना


• STEM शिक्षणाची ओळख


• कारकीर्द मार्गदर्शन व कौशल्य विकास


• शाळा व समाजातील सशक्त नाते


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi